Wednesday, November 18, 2009

रिक्षा पढो

एका उर्दू नाटकात, बुढ्ढा घर पे है किंवा बकरा किश्तो पे... ती व्यक्तिरेखा म्हणते. अरे शायरी करनी है तो किताबेँ पढने की कोई जरूरत नही. ट्रक पढो रिक्षा पढो. खरंच चालता चालता डोळे उघडे ठवेल तर ओठावर हसू आणणाऱया कितीतरी गोष्टी असतात...आजच एका रिक्षाच्या मागच्या बाजूला लिहिलं होतं....
चिटके तो फटके

सहज आठवण आली

१८ नोव्हेंबर... विसरूच शकत नाही ही तारीख...मला लोकसत्तामध्ये लागून जेमतेम महिना झाला होता...बाबांनी एक्झिट घेतली. येत्या शनिवारी वस्त्रहरणचा प्रयोग आहे. आई सांगत होती, फार वर्षांपूर्वी. तेव्हा आम्ही वांद्र्याला राहत होतो. मच्छिंद्र कांबळीने बाबांना निमंत्रित केलं होतं प्रयोगासाठी...मी खूप लहान होतो. बाबा म्हणाले चला जाऊ या. मी म्हटलं, नाटक नको, मला खेळायचं आहे...मग बाबांनी त्यांची तिकीटं ऑफिसमधल्या कोणालातरी देऊन टाकली. त्यानंतर आईने वस्त्रहरण नाटक पाहिलेले नाही. बाबांचंही राहूनच गेलं असेल. आणि आज मी त्या नाटकाच्या बातम्या करतोय. उद्या तर कलाकारांना भेटणार आहे. वाटतं बाबा असते तर??? काही प्रश्नांना उत्तरं नसतात.

Wednesday, May 13, 2009

प्रथम दिवसे

आज पहिल्यांदाच युनिकोड वापरून टाईप करतोय. हा छान प्रकार आहे. युनिकोड आपल्याकडे आला. छान झाले. आपण तो फुकट वापरतो. पण खरच हा फुकट आहे का? मायक्रोसॉफ्ट भारतावर एवढी मेहेरबान नाही होणार की, ते आपली भाषा त्यांच्या अॅप्लिकेशन्समध्ये फुकट वापरून देतील. त्यांनी ही सोय द्यावी म्हणून भारत सरकारने त्यांना अर्थातच काही रक्कम देऊ केली आहे. मध्यंतरी मी शुभानन गांगल या गृहस्थांना भेटलो. मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱया या माणसाने मराठी भाषेबाबत फार काम केले आहे. गेली तीस वर्षे ते मराठी भाषेबाबत काम करत आहेत.
आपल्या भाषेचा मुख्य फायदा किंवा जमेची बाजू ही की ही मौखिक भाषा आहे. आपण जे बोलतो ते लिहितो. इंग्रजी ही चित्रभाषा आहे. त्यामुळे एखाद्या स्पेलिंगचा उच्चार कसा करायचा हे त्यांना समजावून सांगावे लागते. कारण 'ए' हे मूळाक्षर तेथे hare (ए), cat (अॅ), ball (ऑ) असे विविध प्रकारच्या शब्दांमध्ये वापरले जाताना त्याचा वेगवेगळा उच्चार होतो. मराठीत हे संभवत नाही. उच्चाराप्रमाणे आपण भाषा लिहितो. जगातील कोणतीही भाषा आपण मराठी लिपीतून लिहू शकतो. स्पेलिंग हा प्रकार आपल्याकडे संभवत नाही. आता तुम्ही म्हणाल की, ऱ्हस्व आणि दीर्घ हे प्रकार आपल्याकडे आहेतच की? एकदम बरोबर... पण का हो, खरंच या ऱहस्व दीर्घाची गरज आहे का?