Monday, January 4, 2010

एका सदऱयाला चार तास तर साडीला किती?

दाढी, आंघोळ आणि खरेदी हा प्रकार खरे तर पटकन आटपायचा...पण खरेदी या शब्दाच्या मागे 'लग्नाची' हे विशेषण लागले की, दोन मिनिटांचे दोन तास होतात. अलीकडेच हा प्रकार याची देही याची डोळा अनुभवला. याची देही या शब्दाचा अर्थ इकडे शब्दश: घ्यायचा आहे. सुरुवात सदऱयाने झाली. म्हटलं कॉटन बाजारमध्ये होऊन जाईल. पण पटकन होईल ती 'लग्नाची खरेदी' खरेदी कसली? एक सदरा ट्राय केला, मग दुसरा... पसंत नाही पडला त्यामुळे दुसऱया दुकानात गेलो, तिथून तिसऱया... या खरेदीसाठी नेमका टीशर्ट घालून गेलो होतो. त्यामुळे दर वेळी टी-शर्ट काढा, सदरा घाला, असा व्यायाम प्रकार सुरू होता. टी शर्ट एक और सदरे पचास अशी काहीशी परिस्थिती झाली होती. सदरा पसंत पडेल तेव्हा पडेल. पण एकसारखी काढ-घाल केल्यामुळे टीशर्टच्या गळ्याचा भायखळा होण्याची भीती वाटत होती. ठाण्याच्या कॉटन बाजारनंतर केंब्रिज, त्यानंतरच्या दुकानांची नावे आठवत नाहीत. कुठे रंग छान तर हात तोकडे, कुठे कापड छान पण हात तोकडे अशी गत होत होती. माझे हात म्हणजे 'अजानबाहुत्वाला दोन बोटे कमी' असे आहेत. त्यामुळे आवडण्याची कारणे अनेक होती, पण हात तोकडे हे नावडण्याचे एकमेव कारण. या प्रकारात सुमारे अडीच-तीन तास गेले. माझा उत्साह मावळत होता, पण 'ही' मात्र ठाम होती. संदीपही 'हा ट्राय करून पाहा' वगैरे थोडे चीअर वर्ड्स म्हणून उत्साह टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत होता. मध्येच आता अंगठी पाहू या म्हणून मी त्या दोघांना थोडं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला पण हीचा निश्चय ठाम होता. ठाणा नाही, म्हटल्यावर आमचा मोर्चा निर्मल लाईफस्टाईलकडे... फॅब इंडियामधील सदऱयाचे हात अजानबाहूंसाठी असतात हे ऐकले होते, त्यामुळे तिथे गेलो. हात मोठे असले तरी मूळात तिथले सदरे अगदीच कॅज्युअल...तो सदरा घालून साखरपुड्याला उभा राहिलो, तर पाहुण्यांनी मला ओळखलेही नसते. पण तिथल्याच एका माणसाने खत्रीकडे अंगुलीनिर्देश केला. खत्री हे केवळ सदऱयांचेच दुकान...पण किमती निर्मल लाईफस्टाईलमुळे काकणभर जास्तच.. अखेर तो क्षण आला...मला, हिला आणि संदीपला तो सदरा आवडला...अर्थात हात थोडे शॉर्टच होते, पण मोठ्या मापाचा आणि हात अल्टर कमी करून मला हवा तसा सदरा मिळाला... चार तासांची पायपीट आणि रिक्षापीटीचे चीज झाले. पुलंच्या प्रवासवर्णनात सूट कसा शिवलाय हे पाहण्यासाठी जे करतात त्याला ट्रायल म्हणतात असे वर्णन आहे, पोलीसांकडून होणाऱया चौकशीलाही ट्रायलच म्हणतात असे पुलंनी लिहिले आहे. त्यांना आलेला हा स्वानुभव युनिव्हर्सल आहे, याची प्रचिती मलाही आली. असो, खरेदीला किती वेळ लागणार आहे, याची पहिली झलक मिळाली. न जाणो, पटकन खरेदी झाली असती तर पुढेही मी गाफील राहिलो असतो...आता मात्र पूर्ण तयारी आणि भरपूर वेळ काढून खरेदीला जाणार आहे. पुढच्या रविवारी मिशन अंगठी आणि साडी....